
कराड तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान देणारे माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्याम ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर (वय 91) यांचे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी (कपिल उपवन, बिबेवाडी) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड शहरासह सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राने एक प्रगल्भ, निष्ठावान व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी सात वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
उपनगराध्यक्ष ते मंत्री
श्याम आष्टेकर यांचा जन्म 2 ऑगस्ट 1934 रोजी कराड येथे झाला. त्यांचे कराडमधील शिक्षण टिळक हायस्कूल येथे झाले. तरुण वयातच त्यांनी समाजकारणाची वाट निवडली आणि स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. कराड नगरपालिकेचे 10 वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहरविकासात मोलाची भूमिका बजावली. 1985 साली प्रथमच आमदार म्हणून निवडून येत त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सलग दोन कार्यकाळ (10 वर्षे) केले. त्यांच्या कार्यकाळात कराड तालुक्याला मिळालेले पहिले मंत्रिपद हा कराडसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
आष्टेकर यांनी क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागांचे मंत्रिपद नऊ वर्षे भूषविले. या काळात त्यांनी सातारा आणि धाराशिव जिह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कराड आणि सातारा जिह्याच्या विकासाची नवी दिशा ठरली. ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन अशा अनेक क्रीडा संस्थांवर नेतृत्व करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले, जे आज महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राचा गौरवशाली मानाचा तुरा आहे.
आष्टेकर यांनी तळबीड एमआयडीसी या औद्योगिक प्रकल्पाचे स्वप्न साकार केले. कराडच्या ‘प्रीतिसंगम’ परिसरात उद्योगांचा पाया घालून त्यांनी तालुक्याला औद्योगिक ओळख मिळवून दिली. त्यांचा राजकीय प्रवास पुरोगामी लोकशाही दलापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत चालला. या संपूर्ण काळात त्यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठता जपली. त्यांच्या कार्यकाळात कराड, तसेच सातारा जिह्याचा सर्वांगीण विकास झाला. राजकारणात स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचा आदर्श त्यांनी घालून दिला.