
दोन महिन्यांचे बिल न भरल्याने रायता पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे रायते गावासह सहा गावातील पाणीपुरवठा आज बंद झाला असून सर्व गावात अक्षरशः ठणठणाट होता. यामुळे ऑक्टोबर हिटच्या तडाख्यातच महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागली.
कल्याण तालुक्यातील २२ गावांसाठी १९७० साली रायता पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पुढे २००५ नंतर केवळ रायते, गोविले, पिंपळोली, घोटसई, आजखर, वावोली तसेच काही पाड्यांना या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र दोन महिन्यांचे तब्बल दोन लाख ५६ हजार ६३० रुपये थकीत वीज बिल असल्याने या योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे या सर्वच गावातील पाणीपुरवठा बंद झाला असून टळटळत्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. वीजपुरवठा सुरू न झाल्यास या परिसरातील गावांना आणखी काही दिवस पाणीपाणी करण्याची वेळ आली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी धावाधाव
रायते पाणीपुरवठा योजनेवर जवळपास आठ ते नऊ हजार नागरिकांची तहान भागते. वीजपुरवठा खंडित झाल्याने रायते पिंपळोलीच्या सरपंच समिता सुरोशी तसेच प्रशासनाने पंचायत समिती, ठाणे जिल्हा परिषद, वीजपुरवठा उपअभियंता यांच्याशी संपर्क साधत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी धावाधाव केली.
“दोन महिन्यांचा थकीत बिल न भरल्याने रायता पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, विजेचे बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू करू.“
गणेश पवार, उपकार्यकारी अभियंता, टिटवाळा (ग्रामीण विभाग)