माथेरान घाट धोक्याच्या वळणावर; तुटलेले रेलिंग बसवलेच नाही, बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अपघाताचा धोका

वाहनाच्या धडकेने माथेरान घाटातील पिटकर पॉइंटवर सुरक्षा रेलिंग तुटले आहे. मात्र महिना उलटूनही या ठिकाणी नवीन सुरक्षा रेलिंग बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांचे एखादे भरधाव वाहन दरीत कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घाटात असे अनेक ब्लॅक स्पॉट असल्याने माथेरानचा मार्ग धोक्याच्या वळणावर आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अपघात होण्याचा धोका आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये दररोज हजारो पर्यटक येतात. मात्र माथेरानला जाणारा घाटरस्ता सध्या धोकादायक बनला आहे. पिटकर पॉइंट या वळणावरील सुरक्षा रेलिंग मागील अपघातात तुटले होते. मात्र प्रशासनाने याची दुरुस्ती केली नाही. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी अपघात झाला. या अपघातात पाच पर्यटक जखमी झाले तर एक महिला थोडक्यात बचावली होती. या घटनेला महिना उलटून गेला तरीदेखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही. ‘आता तरी प्रशासनाला जाग येणार का, आणखी किती अपघात झाल्यावर रेलिंग बसवणार, कोणाचा जीव गेल्यावर उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

अन्यथा आंदोलन करू

केवळ पिटकर पॉइंटच नव्हे तर जुमापट्टीसह घाटातील अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे तुटलेले आहेत. काही ठिकाणी डोंगरावरून वाहून आलेल्या दरडीमुळे रेलिंग मोडली आहेत तर काही ठिकाणी मातीचा व दगडांचा मलबा थेट कठड्यांवर येऊन आदळल्याने ती निष्क्रिय झाली आहेत तर काही वाहनांच्या अपघातामुळे तुटली आहेत. तरी याठिकाणी मजबूत रेलिंग बसवावेत अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्थानिक व टॅक्सीचालक मालक संघटनेने दिला आहे.