
मीरा-भाईंदर शहरात ठेकेदाराने सहा महिन्यांपूर्वी बनवलेले सिमेंटचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. तकलादू कामाची गंभीर दखल घेत पालिकेने जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर या ठेकेदार कंपनीवर बडगा उगारत ४० लाखांचा दंड ठोठावला. शिवाय निकृष्ट रस्ते उखडून टाकत पुन्हा नव्याने दर्जेदार रस्ते बनवण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
भाईंदर पूर्वेच्या गोळवलकर गुरुजी रोड ते प्रफुल्ल पाटील चौक, मीरा रोड पूर्व परिसरातील शिवपूजा इमारत ते प्लेझंट पार्क, मीरा गाव येथील अमर पॅलेस ते कोंबडी गल्ली आणि मीरा रोडमधील पूनम गार्डनपर्यंतचा सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर या कंत्राटदार कंपनीला काम दिले होते. नवीन सिमेंट रस्ते बनवत असताना ठेकेदाराने निकृष्ट काम केले. अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांना तडे गेले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येताच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर निकृष्ट रस्ते उखडून टाकण्याचे काम सुरू केले. आता त्या ठिकाणी नवीन सिमेंट रस्ते बनविण्यात येणार आहेत.