Philippines earthquake – फिलिपाईन्स पुन्हा भूकंपानं हादरलं; रिश्टर स्केलवर 7.6 तीव्रतेची नोंद, त्सुनामीचा इशारा

फिलिपाईन्सला पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. दहा दिवसात दुसऱ्यांदा फिलिपाईन्सची धरती हादरली असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.6 मापण्यात आली आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर फिलिपाईन्सला त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फिलिपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; 60 जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले, बचावकार्य सुरू

शुक्रवारी सकाळी फिलिपाईन्समध्ये जोरदार भूकंप झाला. फिलिपाईन्स इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र विभागाने मिंडानाओच्या दावाओ ओरिएंटलमधील माने शहराजवळील समुद्रात 10 किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदु असल्याचे सांगितले. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून किनारी भागात राहणाऱ्या रहिवाशांना उंच ठिकाणावर स्थलांतर होण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपानंतर उंच लाटा येऊ शकतात. किनारी भागामध्ये तीन मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. तर इंडोनेशिया आणि पलाऊमध्येही लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच या भूकंपामुळे काही इमारतींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.