संत सखू

>> प्रा. शरयू जाखडी

संतांच्य्या मांदियाळीत आपल्या एकनिष्ठ भक्तीने अजरामर झालेली ही संत सखू.. पंढरपूरच्या या सखूचे लग्न कराडच्या दिगंबर घोगरेशी झाले. तिच्या सासरची तथाकथित प्रतिष्ठित घराण्यातील मंडळी अत्यंत क्रूर व कपटी होती. गरीब स्वभावाच्या सखूच्या ईश्वरभक्तीची पाळेमुळे घट्ट होती. ती विठ्ठलाची एकनिष्ठ परमभक्त होती. एक दिवस ती नदीवर पाणी आणायला गेली असता तिला वारकऱयांची दिंडी टाळमृदंगाच्या घोषात पंढरपूरकडे जाताना दिसली. भान हरपून मोठय़ा भक्तिभावाने दिंडीत सामील होऊन ती पंढरपूरच्या दिशेने चालू लागली, परंतु एका दुष्ट गावकऱयाने तो वृत्तांत्त सखूच्या नवऱयाला कळवला. ते ऐकून सखूचा नवरा रागाने बेफाम झाला आणि सखूला मार देत घरी आणावे म्हणून बाहेर पडणार इतक्यात त्याला घरातून सखूचा व तिच्या बांगडय़ांचा आवाज ऐकू आला. त्याने आत पाहिले तर सखू घरात काम करीत होती. नवलकथा अशी की, ज्या पांडुरंगाच्या भरवशावर सखू पंढरीची वाट चालत होती, तो पांडुरंग सखूचे रूप घेऊन घरात वावरत होता. भक्ताचे रक्षण करण्यासाठी पांडुरंग वाटेल ते कष्ट भोगण्यास तयार असतो. एकनाथांच्या घरीही पांडुरंग असेच श्रीखंडय़ाचे रूप घेऊन काम करीत होते, त्याची आठवण येते.