
धाराशिवच्या नूतन बस स्थानकामधील चालक-वाहक आराम कक्षाचा पीओपी कोसळला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र अवघ्या काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या या बस स्थानकाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या नूतन बस स्थानकातील वरच्या मजल्यावर चालक आणि वाहक यांना आराम करण्यासाठी रुम बनवण्यात आलेली आहे. या रुमचा पीओपी ढासळला. ही घटना घडली तेव्हा रुममध्ये चालक, वाहक आराम करत होते. सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.
मागील सहा महिन्यापूर्वीच 10 कोटी रुपये खर्च करून बस स्थानकाची इमारत बांधण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 30 एप्रिल रोजी बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. याला चार महिने होत नाही तोच रुमचा पीओपी कोसळल्याने कामाच भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू आहे. तसेच बस स्थानकामध्ये पाण्यासह इतरही सुविधा नसल्याने चालक वाहकांच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत.
धाराशिव बस स्थानकातील चालक-वाहक आराम कक्षातील पीओपी कोसळला, 4 महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं उद्घाटन pic.twitter.com/ZkxjhanrnR
— Saamana Online (@SaamanaOnline) October 11, 2025