प्रश्न, शंका आणि रहस्य… निवडणूक आयोगासमोर उलगडा करावा लागणार; राज ठाकरे येणार; संजय राऊत यांनी दिली माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. निवडणूक आयोगाला भेटणे औपचारिकता आहे. काही प्रश्न, शंका आणि रहस्य असून त्याचा उलगडा निवडणूक आयोगासमोर करावा लागेल, असेही राऊत शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाला भेटणे औपचारिकता आहे. औपचारिकता म्हणजे भींतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे. पण ही लोकशाही व्यवस्थेने निर्माण केलेली संविधानिक व्यवस्था असल्याने आमच्या भूमिका वारंवार त्यांच्या समोर मांडाव्या लागतील. 14 ऑक्टोबर, 2025 रोजी साडे बारा वाजता निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल.

या शिष्टमंडळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे प्रमुख राज ठाकरे, कॉ. अजित नवले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुभाष लांडे, जयंतराव पाटील यांचा समावेश असून अबू आझमी यांनाही आमंत्रण दिले आहे, असे राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग संविधानक पद असून प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्याही आहेत. फडणवीस हे भाजपचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनाही येण्याची विनंती केली आहे. युतीतील इतर पक्ष अजित पवार आणि मिंध्यांनाही पत्र पाठवले आहे. हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे. निवडणूक आयोगसमोर प्रत्येकाने भूमिका मांडायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात

नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील 3 लाख मतं गाळली गेली. नितीन गडकरी स्वत: याबाबत बोलले म्हणजे हा विषय गंभीर आहे. हे सगळे विषय निवडणूक आयोगापुढे मांडावे लागतील. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावे आणि सहभागी व्हावे. हे विरोधी पक्ष किंवा महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत अद्याप नाही, तरीही ते येत आहेत. कारण विषय गंभीर आहे. फडणवीस यात सहभागी झाल्यावर भाजपला काय म्हणायचे, हे लोकांसमोर येणार नाही. आम्ही पूर्ण तयारीने जात आहोत. त्यानंतर पत्रकार परिषद आहे. तिथे सुद्धा आमच्या भूमिका मांडू, असेही राऊत म्हणाले.