
तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा हिंदुस्थानात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले आहेत. टिळक भवन येथे पत्रकार परिषेत बोलताना ते म्हणाले की, भाजपाला हिंदुस्थानला तालिबान करायचा आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत महिलांना सन्मानाने आमंत्रित केले जाते, अशी मिश्किल टिप्पणीही सपकाळ यांनी यावेळी केली.
आरक्षणाच्या मुद्द्याववर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजा-समाजात भांडणे लावत आहेत. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नितीचा ते अत्यंत थंड डोक्याने वापर करून समाजात भांडणे लावत आहेत. नथुरामने जसे अत्यंत थंड डोक्याने महात्मा गांधी यांचा खून केला. गांधींवर गोळ्या झाडण्यापूर्वी नथुराम त्यांच्या पाया पडला होता. देवेंद्र फडणवीसही थंड डोक्याने कृती करतात. यात फडणवीस व नथुराम यांची तुलना केलेली नाही तर दोघांची मोडस ऑपरेंडी एकच आहे.”
शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा
सोयाबिनला ५४०० रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र ३२०० ते ३७०० रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतकऱ्यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली केली. सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.