एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात बेरोजगारांचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, आठवडाभरात ठोस निर्णय घेतला नाही तर सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही!

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील 10 लाख तरुण-तरुणींना लाडका भाऊ योजने अंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली खरी. मात्र निवडणुका संपल्यावर त्यांना वाऱयावर सोडले असून हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना मानधनाची फुटकी कवडीही मिळाली नसल्याने 36 जिल्हय़ांतील हजारो बेरोजगार तरुणांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात जोरदार आंदोलन केले. त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. आठवडाभरात ठोस निर्णय घ्या अन्यथा सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा या वेळी संतप्त युवाशक्तीने दिला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. 10 लाख युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमहिना 6 हजार व 10 हजार मानधन देण्यासोबतच सेवेत कायम करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दिले होते. मात्र 13 आंदोलने करूनही तब्बल 1 लाख 75 हजार प्रक्षिणार्थी आज बेरोजगार बनले आहेत. प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधनात दुप्पट वाढ करा तसेच येत्या अधिवेशनात रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी या वेळी केल्या.

एकनाथ मामाने भाचा-भाचींना फसवले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनेची घोषणा केली. त्यानंतर तरुण-तरुणांची मते घेतली. आता या मुलांना वाऱयावर सोडण्याचे काम सरकारने केले आहे. एकनाथ मामाने तर आपल्या भाचा-भाचींना फसवले असल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने केला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंची शिष्टमंडळाने भेट घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. जर या आंदोलनानंतर सरकारने आश्वासन पाळले नाही तर आमची दिवाळी काळी करणाऱया सरकारलाही येणारी दिवाळी साजरी करू देणार नाही. – बालाजी पाटील-चाकूरकर (प्रदेश कार्याध्यक्ष – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना)