भाजप-जेडीयू समान जागा लढणार, कोणीही मोठा भाऊ नाही!

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये मोठा भाऊ कोण याविषयी उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. भाजप-जेडीयू दोन्ही पक्ष समान जागा लढणार आहे. त्यामुळे कोणीही मोठा आणि छोटा नाही हे स्पष्ट झाले आहे.

एनडीएने केलेल्या घोषणेनुसार, भाजप व जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आल्या आहेत. तर, हिंदुस्थानी अवाम मोर्चा व राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत. मांझी यांनी 15 जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना अवघ्या 6 जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली. त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.

कुशवाहांच्या नाराजीमुळे टेन्शन

एनडीएने जागावाटप जाहीर केले असले तरी राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांच्या नाराजीमुळे टेन्शन वाढले आहे. त्यातच कुशवाहा यांनी केलेल्या ‘एक्स’ पोस्टने लक्ष वेधले आहे. ‘चर्चा अद्याप संपलेली नाही. बातम्यांवर विश्वास ठेवू नका,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांना जागावाटप मान्य नसल्याचा अर्थ यातून काढला जात आहे. कुशवाहा यांना पसंतीच्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते अडून बसले आहेत. भाजपाध्यक्ष नड्डा यांच्याशी चर्चेनंतरही त्यांचे समाधान झालेले नाही.