ऑक्टोबर हीटचा मुंबईकरांना ‘ताप’!

मान्सूनने एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा सुरू झाल्या आहेत. कमाल तापमान 35 अंशांच्या जवळपास पोहोचू लागल्याने मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. अचानक झालेली तापमानवाढ तापासह इतर आजारांना निमंत्रण देत आहे. त्यातच उपनगरांतील प्रदूषण धोक्याची पातळी गाठत आहे. पुढील काही दिवस मुंबईचा पारा 34 ते 35 अंशांच्या आसपास राहील, तसेच दिवाळीत पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनने दोन दिवसांपूर्वीच मुंबई-ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. त्यानंतर तापमानाची पातळी वाढली आहे. कमाल व किमान अशा स्तरांवर तापमानात अचानक तीन ते चार अंशांची मोठी वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सूर्यदर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, रविवारी सांताक्रुझमध्ये 34 अंशांच्या पुढे तापमान होते आणि कुलाब्याचा पारादेखील 34 अंशांच्या आसपास गेला होता. त्यामुळे शहरभर उन्हाची तीव्रता जाणवत होती. 15 ऑक्टोबरनंतर कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे उसळी घेणार आहे. दिवाळीत काही काळ ऑक्टोबर हीटचा ‘तप्तावतार’ कायम असेल. याचदरम्यान 17 ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास

मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी परिसरात ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हवेची गुणवत्ता खालावल्याने अधिक त्रास होत आहे. सकाळी शुद्ध हवेऐवजी धूरकेसदृश स्थिती निर्माण होऊ लागल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दमा व अन्य श्वसनविकार असलेले कित्येक नागरिक मागील दोन दिवसांपासून ‘मार्ंनग वॉक’ला जाणे टाळत आहे. अनेक नागरिक सततच्या खोकल्याने त्रस्त असल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

हवेची गुणवत्ता घसरली

एकीकडे उन्हाची तीव्रता वाढली असतानाच हवेची गुणवत्ता घसरली आहे. तुलनेत उपनगरांमध्ये प्रदूषण वाढीस लागले आहे. देवनार, चेंबूर, शिवडी, मालाड, बोरिवली आदी भागांतील हवेची गुणवत्ता चिंताजनक स्तरावर आहे. देवनारमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 209 इतका नोंद झाला.