
“शिक्षणाची सुरुवात कुतूहल आणि मोकळ्या मनाने होते. आपल्याला असं वातावरण हवं आहे जिथं मुलं भीती किंवा दबावाशिवाय प्रश्न विचारू शकतील. शिक्षण हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नसावा, कारण तो स्वातंत्र्याचा खरा पाया आहे,” असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत.
काँग्रेसने रविवारी X वर दक्षिण अमेरिकन देशातील पेरूच्या पोंटिफिकल कॅथोलिक विद्यापीठ आणि चिली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांच्या संवादाचा १२ मिनिटे १९ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात शिक्षण, लोकशाही आणि जगातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राहुल गांधी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिसत आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, “प्रत्येक मुलाला शिकण्याचं आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य असलं पाहिजं. हे केवळ श्रीमंत किंवा काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित नसावं. हिंदुस्थानला लोकशाही वातावरणात भरभराटीला येणारी एक नवीन उत्पादन व्यवस्था तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी अमेरिका किंवा पेरूसारख्या देशांसोबत भागीदारी फायदेशीर ठरू शकतं.”