पोलीस डायरी – रक्तरंजित पुण्यात… मंत्र्यांकडून शस्त्र परवाना, सौदेबाजीचे गूढ !

>> प्रभाकर पवार 

देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्याच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या वादग्रस्त शासकीय निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात येत आहे. वयाची सत्तरी पार पडलेले, जिभेवर कोणताच लगाम नसलेले व कायम नकारात्मक वक्तव्य करणारे माजी गृहराज्यमंत्री रामदास गंगाराम कदम यांचे विद्यमान राज्यमंत्री हे चिरंजीव आहेत.

रामदास कदम हे गृहराज्यमंत्री असताना त्यांचा या खात्यावर चांगलाच जीव होता. त्यामुळे हे खातेही आपल्या मुलाला मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्यांचा मुलगा गृहराज्यमंत्री झाला, परंतु तो सुसाट सुटला. स्वतःचा लेडीज बार असतानाही त्याने इतर लेडीज बारना टार्गेट करणे सुरू केले. नवी मुंबईतील एका लेडीज बारवर छापा मारला. या कारवाईनंतर लेडीज बारवाले आपणास शरण येतील असे या गृहराज्यमंत्र्याने अनुमान काढले होते, ते चुकले। कोणीही त्यांना शरण गेले नाही. उलट या गृहराज्यमंत्र्याच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर या गृहराज्यमंत्र्याने लेडीज बारवरील कारवाई स्थगित केली, तर मुंबई पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना अडचणीत आणणाऱ्या, गृहराज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावे असलेल्या कांदिवली येथील लेडीज बारवर कारवाई करून हा बार बंद पाडला. गृहराज्यमंत्र्यांना ही चपराकच होती. नवी मुंबईतील लेडीज बारवरील कारवाई बुमरँगसारखी गृहराज्यमंत्र्यांवरच उलटली… या अनुभवातून योगेश कदम काहीतरी शिकतील असे वाटले होते, परंतु त्यातून काही ते शिकले नाहीत. उलट वडिलांचे मार्गदर्शन त्यांना चांगलेच भोवले. मुंबईन आयुक्तांचा सक्त विरोध असतानाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अग्निशख परवाना मंजूर केला. त्यात सोदेबाजी किती होती हे कळू शकले नाही.

आजच्या घडीला अग्निशस्त्र मिळविण्यासाठी किमान २० ते २५ लाख रुपये मोजावे लागतात, असे एजंट सांगतात. दीड-दोन दशकांपूर्वी हा रेट २ लाख रुपये होता. दिल्लीची कृपा’ असलेल्या एका हेवी वेट, ताकदवान गृहराज्यमंत्र्याने तर मुंबईत १९९९ ते २००४ या काळात खिरापतीसारखे अग्निशख परवाने वाटले. पूर्व उपनगरातील सिंग नावाच्या सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाला १०० च्या वर रायफलचे परवाने वितरित केले. दिल्लीत वजन असल्यामुळे ‘कृपा’च्या शिफारसी मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून सहसा नाकारल्या जात नव्हत्या. त्याचा कृपाने पुरेपूर फायदा उठविला. कृपा अल्पावधीतच मालामाल झाला हे संजय तिवारी नावाच्या समाजसेवकाच्या लक्षात आल्यावर त्याने कृपाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आदींकडे तक्रारी केल्या, परंतु कुणीही त्याची दखल घेतली नाही. तेव्हा संजय तिवारीने कोर्टात धाव घेतली. कोटनि पुरावे पाहून संजय तिवारीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ‘कृपा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल झाला त्याच वेळी महाराष्ट्रात सत्तांतर झाले. कृपाने संधी साधून लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याची अटक टळली. गुन्हेही ‘रफादफा’ करण्यात आले. एका भ्रष्टाचारी मंत्र्याला भाजपने प्रेमाने कुशीत घेतले.

मुंबईतील बांधकाम व हॉटेल व्यावसायिकांना अग्निशस्त्र परवाने मंजूर करून कृपासारखे तत्कालीन गृहराज्यमंत्री धनवान झाले, तर काहींनी डान्स बारवर धाडी टाकून आपले उखळ पांढरे करून घेतले. सांताक्रुज येथील ‘लक्षदीप’ व दादर (पूर्व) येथील ‘बेवॉच’ हॉटेलवरील तत्कालीन गृहराज्य मंत्र्यांच्या धाडी भलत्याच गाजल्या. दादरच्या एका बारवाल्याने सोलापूर मतदारसंघातून निवडून आलेल्या एका गृहराज्यमंत्र्यावर तर हप्ता वसुलीचे (चॅनेलसमोर येऊन) जाहीर आरोप केले होते. छोटा राजनचा साथीदार डी. के. रावनेही याच वादग्रस्त तत्कालीन गृहराज्यमंत्र्याने नाशिक शहरात (ओ.पी. सिंगची हत्या झाल्यावर) आपणास मदत केली असल्याचे छोटा राजनला फोन करून सांगितले होते. डी. के. राव व छोटा राजनचे मुंबई क्राईम बेंचने संभाषण ‘टॅप’ केले तेव्हा ही माहिती उघड झाली होती. लेडीज बारवर धाड टाकणारे तत्कालीन वादग्रस्त गृहराज्यमंत्री बदनाम झाले. त्यात आता योगेश कदम यांची भर पडली आहे.

ज्यांच्याकडे गृहखाते असते त्या मंत्र्याकडे गुंड टोळ्या मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. यात काय आता नवीन राहिलेले नाही. राजकारण्यांच्या बऱ्या-वाईट कामासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी गुंडच कामी येतात. पुण्यामध्ये अनेक गंभीर गुन्हह्यांची नोंद असलेला ‘मोक्का’चा फरार आरोपी निलेश गायवळ याचाही आगामी निवडणुकीसाठी फायदा होईल म्हणून योगेश कदम यांनी त्याचा भाऊ सचिन गायवळला शस्त्र परवाना मंजूर केला, परंतु पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अगदी हिमतीने गृहराज्यमंत्र्यांची ही शिफारस धुडकावून लावली. ही बाब स्वागतार्ह म्हणावी लागेल. हीच हिंमत निलेश गायवळ हाती लागल्यावर पोलीस आयुक्तांनी दाखवावी. निलेश गायवळचे जसेच्या तसे स्टेटमेंट रेकॉर्डवर आणावे. ज्या मंत्र्यांशी, सत्ताधाऱ्यांशी निलेशचे फोटो आहेत त्यांनी निलेशकडून कोणकोणती कामे करून घेतली हे आयुक्तांनी उघड करावे. परंतु निलेश जे बोलेल, स्फोट करेल ते कधीच रेकॉर्डवर घेतले जाणार नाही हे लक्षात ठेवा. सत्ताधारी, राजकारणी अडचणीत येणार नाहीत असे स्टेटमेंट घेऊन पोलीस निलेशविरुद्ध आरोपपत्र दाखल करतील.

राजकारण्यांनी गुंड टोळ्या पोसल्यामुळेच प्रमोद माळवदकर, गजा मारणे, बाळ आंदेकर यासारख्या शंभरच्यावर टोळ्या पुण्यात वाढल्या. आंदेकर टोळीचे तर चार नगरसेवक महानगरपालिकेवर निवडून गेले होते. राजकारण्यांचे हे पाप आज पुण्यात धुडगूस घालीत आहे. रक्तपात करीत आहे. याला जबाबदार राजकारणीच आहेत. नाही तर पुण्यात कोयता गँगचा संसर्ग वाढलाच नसता. निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी मंडळी गुंडांना शस्त्र परवाने वितरित करतात, त्यांना पाळतात, याला काय म्हणावे? अलीकडे पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोयत्याचे, तलवारीचे वार केले जात आहेत. वाहने फोडली जात आहेत. त्याचे रिल्स तयार करून दहशत निर्माण केली जात आहे. अशा या मस्तवाल गुंडांकडे राजकीय दबावामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे हे किती काळ चालणार आहे? आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत… म्हणजे खूनखराबा हा आलाच! सारेच कोडे!