दिल्लीकरांसाठी खूशखबर! दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

दिवाळीआधी दिल्लीकरांना सर्वोच्च न्यायालयाने खूशखबर दिली आहे. या दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त प्रमाणित पर्यारवणपूरक फटाके ( Green Firecrackers) वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. पर्यावरण संरक्षण आणि जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पोलिसांना गस्त पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

या दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त हिरवे फटाके वापरण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या दोन दिवस आधी आणि त्या दिवशी म्हणजेच १८ ते २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच हिरवे फटाके फोडता येतील असा आदेश दिला आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने म्हटले आहे की फटाक्यांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उत्सव साजरा करण्याच्या अधिकारांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. अर्जुन गोपाल यांच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात अ‍ॅमिकस क्युरीने उपस्थित केलेल्या गंभीर चिंता आणि फटाक्यांच्या तस्करीच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले.

न्यायालयाने नमूद केले की गेल्या सहा वर्षांत हिरव्या फटाक्यांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि त्यांचा दर्जा चांगला आहे. २०२४ मध्ये जीएनसीटीडीने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली होती, परंतु आता दिल्ली आणि केंद्र सरकारने ही बंदी शिथिल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने असेही निर्देश दिले की फक्त NEERI-प्रमाणित हिरवे फटाके विक्री आणि वापरासाठी परवानगी असतील. या फटाक्यांवर QR कोड अनिवार्य असतील आणि इतर फटाके वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

केवळ प्रमाणित हिरवे फटाके विकले आणि वापरले जातील याची खात्री करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना गस्त पथके तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावल्या जातील. हरियाणाच्या २२ पैकी चौदा जिल्हे एनसीआरमध्ये येतात आणि अशाच याचिका उत्तर प्रदेश आणि राजस्थानने दाखल केल्या होत्या. न्यायालयाने म्हटले आहे की व्यक्ती आणि उद्योग यांच्या हक्कांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे आणि या दिवाळीत फक्त सुरक्षित आणि पर्यावरणपूरक हिरवे फटाके वापरण्याची परवानगी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.