‘अ‍ॅड गुरू’ पियूष पांडे यांचे निधन

जाहिरात विश्वातील अग्रगण्य नाव व अनेक अजरामर जाहिरातींचे जनक पियूष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. गेले काही दिवस ते न्यूमोनिया संसर्गाने त्रस्त होते. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. पल्स पोलिओ लसीची ‘दो बूंद जिंदगी की’ जाहिरात असो, किंवा ‘कुछ खास है’ म्हणत घरोघरी पोचलेली ‘कॅडबरी गर्ल’ असो वा फेव्हिकोल का जोड असो. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गाणेदेखील त्यांनी लिहिले. उद्या त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पियूष पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडिया कंपनीमध्ये त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ काम केले. पियूष पांडे यांचा जन्म 1955 साली जयपूरमध्ये झाला होता. त्यांचे बंधू प्रसून पांडे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत तर बहीण इला अरुण गायिका आहे. ‘पँडेमोनियम’ हे पियूष पांडे यांचे पुस्तक आहे.

पियूष पांडे यांच्या निधनाने जाहिरात विश्वातील एक युग हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी जाहिरात हे केवळ उत्पादनाच्या विक्रीचे माध्यम नव्हे तर लोकांच्या भावना जोडणारा दुवा बनवले. त्यांच्या कल्पकतेमुळे हिंदुस्थानच्या जाहिरात क्षेत्राला जागतिक दर्जा मिळाला. पांडे यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दिग्दर्शक  हंसल मेहता, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आदींनी पांडे यांना श्रद्धांजली वाहिली.

चार दशकांचा क्रिएटिव्ह प्रवास 

तरुणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू, टी टेस्टर आणि बांधकाम मजूर म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे यांनी 1982 साली ओगिल्वी कंपनीत प्रवेश केला. 27 व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. त्यांनी जाहिरातींना दिलेले शब्द लोकांच्या कायम लक्षात राहिले. एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी मे रंग लाए’, कॅडबरीसाठी ‘कुछ खास है’, ठंडा मतलब कोका-कोला, फेव्हिकॉल आणि हचसाठी पग श्वानाचे कॅम्पेन अशा कितीतरी उत्पादनांना दिलेले शब्द कायम लक्षात राहतील, अशा जाहिराती पांडे यांनी दिल्या. 2016 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.