
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान संतापला आहे. सलमानच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान इतका नाराज झाला की, त्यांनी त्याला दहशतवादी घोषित केले. सलमान खानच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्ताननं त्याचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या (१९९७) चौथ्या अनुसूचीत समाविष्ट केलं आहे. या यादीत दहशतवादात सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी आहे.
चौथ्या अनुसूचीत समाविष्ट होण्याचा अर्थ सलमान खानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. पाकिस्तानमधील त्याच्या हालचालींवर बंदी घातली जाऊ शकतं आणि त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. रियाधमधील जॉय फोरम २०२५ मध्ये सलमानने दिलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, जॉय फोरममध्ये हिंदी चित्रपटांबद्दल बोलताना सलमान खानने बलुचिस्तानला एक वेगळा देश म्हणून वर्णन केलं होतं. तो म्हणाला होता, “सध्या, जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि तो येथे (सौदी अरेबियात) प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींचा व्यवसाय करेल कारण अनेक देशांमधून लोक येथे आले आहेत. बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानातील लोक आहेत, पाकिस्तानातील लोक आहेत… प्रत्येकजण येथे काम करत आहे.” त्याच्या याच वक्तव्यानंतर पाकिस्तानाने त्याला दहशतवादी घोषित केलं आहे.

























































