
एकीकडे पुणे बाजार समितीमधील बेकायदा टपर्या, स्टॉल काढण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिवेशनात केली. मात्र, दिवाळीच्या सुट्टीत मार्केटयार्डात पुन्हा नव्याने दोन टपर्या पडल्या आहेत. वाहतुकीला अडचणी होतील अशा ठिकाणी टपर्या टाकल्याने बाजारात दररोज कोंडी होऊ लागली आहे. मात्र, याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे.
चार वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांच्या काळात वाहतुकीला अडथळा ठरणार्या आणि बेकायदेशीर टपर्या हटविल्या होत्या. बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून फळे भाजीपाला, गुळ भुसार विभागात टपर्या पडत आहेत. दोन आठवड्यापुर्वी फळे भाजीपाला विभागात जय शारदा गजानन गणपती मंडळासमोर एक भली मोठी टपरी पडली होती. आता त्या टपरीलगत आणखी मोठी टपरी थाटली आहे. या टपर्यांचा पसारा अर्ध्या रस्त्यात आला आहे. यामुळे बाजारात शेतमालाची ने आण करणार्या वाहनांना अडथळा होत आहे. तर, शेतमाल ने आण करताना कामागारांना त्रास होतो. या सर्व अडचणींमुळे परिणाम शेतमालावर होतो आणि शेतकर्यांचे नुकसान होत असाताना बाजार समितीचे सचिव याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
सुरक्षा अधिकार्यांचे खिसे गरमागरम
यापुर्वी टपरी काढण्याचे आदेश कर्मचारी अधिकारी यांना दिल्याचे बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यंनी सांगितले होते. मात्र, टपरी हटविण्याऐवजी नविन टपरी पडली. सचिवांचे एकीकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षा विभागातील अधिकार्यांचे खिसे गरम झाल्यामुळे नवनविन टपर्या पडू लागल्याची चर्चा बाजार समितीत आहे. यावर सध्या तरी बाजार समिती प्रशासनाने प्रतिक्रया देणे टाळले आहे.

























































