मुंबईसह कोकण परिसरात 26 ते 30 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात 26 ते 30 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कोकण किनारपट्टीवर आणि बाहेर 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान 35 किमी प्रतितास ते 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

27 ऑक्टोबर रोजी पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर 45-55 ते 65 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी ईशान्य अरबी समुद्र आणि महाराष्ट्र-गोवा आणि गुजरात किनाऱ्यावर 35-45 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे.