वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू, आठ दिवसात तीन जणांचा बळी

शेतात जनावरांसाठी चारा कापत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील गणेशपीपरी गावात घडली, अल्का पांडुरंग पेंदोर ( वय ४३) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. गोंडपीपरी तालुक्यात घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नुकतेच तालुक्यातील चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच, एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणेशपिपरी गावात वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला. चेकपिपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. परिणामी परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत आणि शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.

वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक, राष्ट्रीय महामार्ग बंद

वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला. तीन तासापासून अहेरी-नागपूर राज्य मार्गांवर नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गोंडपीपरी मधील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परस्थितीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.