
सावंतवाडी तालुक्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन कापणीच्या वेळी आलेल्या या पावसाने भातपिकावर गंभीर संकट उभे केले असून शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत.
सावंतवाडीतील पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर कणकवली मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग, वैभववाडी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच कापलेले भात शेतातच सडून गेले आहे. भाताच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले आहेत, ज्यामुळे पीक पूर्णपणे निकामी झाले आहे. भात शेतात पडून असल्याने ओलसर वातावरणामुळे त्याचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही मोठ्या प्रमाणात घसरले आहे. या नुकसानीनंतर महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र नुकसानभरपाई नेमकी कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.




























































