मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेस आक्रमक, देवी-देवता व महापुरुषांचा अपमान खपवून घेणार नाही! सिद्धिविनायक मंदिर स्थानकासमोर तीव्र आंदोलन

मेट्रो स्थानकांच्या नावामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांची नावे घुसवणाऱया महायुती सरकारचा निषेध करीत काँग्रेसने मंगळवारी भुयारी मेट्रोच्या सिद्धिविनायक मंदिर स्थानकासमोर तीव्र आंदोलन केले. मेट्रो स्थानकांची नावे तत्काळ बदला, त्यातील कॉर्पोरेट कंपन्यांची नावे हटवा, देवी-देवता आणि महापुरुषांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारला दिला.

मेट्रो स्थानकांच्या नावांमधून देवी-देवता व महापुरुषांचा अपमान होत असल्याच्या मुद्दय़ावरून मुंबई काँग्रेसने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन केले. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या नावात ‘आयसीआयसी लोम्बार्ड’चे नाव सुरुवातीलाच घुसवले आहे. याकडे लक्ष वेधत काँग्रेसने महायुती सरकारचा निषेध केला. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात उपाध्यक्ष प्रवीण नाईक, काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत, रघुनाथ थवई, स्थानिक ब्लॉक अध्यक्ष दीपक वाघमारे, हेमंत राऊत, प्रणिल नायर, सुरेशचंद्र राजहंस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारला भीक लागलीय का?

भाजप महायुती सरकारने मेट्रो स्थानकांची नावे स्पॉन्सर करून देवी-देवता व महापुरुषांचा अपमान केला आहे. सिद्धिविनायक मंदिर, काळबादेवी, महालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य अत्रे यांच्या नावाने असलेल्या स्थानकांना कॉर्पोरेट कंपन्यांची नावे देऊन भाजपने कॉर्पोरेट हिंदुत्व आणले आहे. पण यातून देवी-देवता, महापुरुषांचा अपमान होत असल्याचे भान सरकारला राहिले नाही. मेट्रो स्थानकांची नावे स्पॉन्सर करून पैसे कमवायला महायुती सरकार, एमएमआरडीए, एमएमआरसीला भीक लागली आहे का, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.