छटपूजेवरून घरी जाताना वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू

छटपूजेवरून घरी जाताना झालेल्या वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पवई येथे घडली. राहुल विश्वकर्मा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. राहुल विश्वकर्मा हा सोमवारी रात्री पवई तलाव येथे छटपूजेसाठी आला होता. छटपूजा आटपून तो बहिणीसोबत मोटारसायकलने घरी जात होता. पवई प्लाझा ओलांडल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आल्यावर मागून एक भरधाव वेगाने बस आली. बसचालकाने बेदरकारपणे बस चालविल्याने राहुलचे मोटारसायकलचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ते बहीण-भाऊ खाली पडले. या अपघातात बसचे चाक डोक्यावरून गेल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला.