यंदा मेंढ्या बसवायच्या कुठे? घाटावरून कोकणात येणाऱ्या मेंढपाळांसमोर यक्षप्रश्न

अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिवाळी संपली तरी पावसाने उघडीप दिलेली नाही. परिणामी रागयड जिल्ह्यासह कोकणात भाताची कापणी आणि कापणीनंतरची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे यंदा मेंढ्या कुठे बसवायच्या? असा प्रश्न घाटावरून कोकणात आलेल्या मेंढपाळांच्या पुढे उभा राहिला आहे. दिवाळी संपल्यानंतर घाटावरून मेंढपाळांचे तांडे मोठ्या संख्येने कोकणात उतरू लागले आहेत.

दरवर्षी दिवाळीनंतर घाटमाथ्यावरील मेंढपाळ मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. कोकणातील भात कापणी दिवाळीपूर्वी सुरू होत असते. मात्र यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यापाठोपाठ समुद्रात मोंथा वादळ उसळले. परिणामी पावसाचा मुक्काम वाढला आणि कोकणातील शेतकऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. भाताची कापणी रखडल्याने पुढील सर्वच कामे खोळंबली. ऑक्टोबर महिना संपला तरी भाताचे पीक शेतात उभे असल्यामुळे मेंढपाळांची मोठी पंचाईत झाली आहे.

कोकणात येताना तारेवरची कसरत

पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे आपल्या मेंढ्या घेऊन पुन्हा माघारी जाणे मेंढपाळांना शक्य नाही. कोकणामध्ये आपल्या मेंढ्या घेऊन येताना मेंढपाळांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच भात कापणी झाली नसल्यामुळे मेंढ्यांना निवारा कुठे द्यायचा, या विचाराने मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहे. परतीच्या पावसाच्या भीतीने भात कापणी खोळंबली आहे. तोपर्यंत मेंढ्या कुठे बसविणार? चाऱ्याचा प्रश्न जरी मार्गी लागत असला तरीसुद्धा निवाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.

भातशेतीचे मोठे नुकसान

रायगड जिल्ह्यासह कोकणात भाताची कापणी सुरू झाल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे कापून ठेवलेला भात शेतात भिजून गेला आहे. अनेक ठिकाणी भाताचा चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही पाऊस उघडीप देण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

१ घाटावरील मेंढपाळ आपले बिहऱ्हाड घोड्यांच्या खांद्यावर टाकून कोकणाकडे येण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुरळक ठिकाणी भात कापणी झाली असून मेंढ्या कुठे बसविणार? हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

२ शेतात भात उभा असल्याने माळरानावर आपला संसार थाटण्याची लगबग मेंढपाळांनी सुरू केली आहे. मात्र या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर गवत असून विविध सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली आहे.

३ भातशेती कापली की शेतात मुबलक प्रमाणात जागा मिळत असते. यामुळे मेंढ्यांच्या निवारासमवेत अन्नांचा प्रश्न मार्गी लागत असतो. मात्र यंदा पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे हे समीकरण कोलमडून पडले आहे.