
तेलंगणातील चेवेल्ला येथील मिरीजगुडा खानापूर रस्त्यावर एका प्रवासी बस व ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तेलंगणा रस्ते वाहतूक मंडळाच्या या बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही बस विक्रमाबाद जिल्ह्यातील तांदूर येथून हैद्राबादला जात होती. त्यावेळी खडी घेऊन निघालेल्या एका ट्रकवर ही बस जोरात आदळली. त्यानंतर ट्रकमधील सर्व खडी बसमधील प्रवाशांच्या अंगावर कोसळली. या अपघातात एका तीन महिन्याच्या बाळासह, तीन महिला व दोन्ही गाड्यांच्या चालकासह 20 जणांचा मृत्यू झाला. यात 20 जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 2 लाखाची मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी याबाबत ट्विट केले आहे.
            
		





































    
    




















