
हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. कोकणातून आलेली महिला रिक्षातून प्रवास करत असताना दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली. त्यात साडेतीन लाखांचे दागिने होते. याबाबत तक्रार येताच कल्याण क्राईम ब्रँचने रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि जयेश गौतम याच्या मुसक्या आवळल्या. मात्र ही रिक्षा बोगस असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचा फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेने डोंबिवलीतील मुलीला भेटून कल्याण पूर्वेकडील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा घेतली. टाटा पॉवरजवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची पिशवी रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या महिलेने मुलीला याबाबत माहिती दिली. तिने कल्याण गुन्हे शाखेकडे याची तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा शोधली. मात्र बॅग आढळली नाही. तसेच ज्या रिक्षात बॅग विसरली होती त्या रिक्षावर बोगस नंबरप्लेट असल्याची माहिती समोर आली. एक नंबर प्लेटच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चलान शोधले. एका चलानमध्ये त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर सापडला. मोबाईल नंबर आणि तांत्रिक तपासाच्या आधारे टिटवाळा परिसरातून चालक जयेश गौतमला अटक केली.































































