
पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणासाठी राज्यातील फडणवीस सरकारने पूर्व द्रुतगती महामार्गावरील शेकडो झाडांवर कुऱ्हाड उगारली आहे. सरकारच्या या निर्णयाला स्थगिती द्या, अशी विनंती करीत शिवसेना मुलुंड विधानसभा संघटक अॅड. सागर देवरे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. प्रस्तावित उन्नत मार्गाच्या रचनेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी तज्ञांची स्वतंत्र समिती स्थापण्याबाबत निर्देश देण्याचीही विनंती याचिकेत केली आहे.
घाटकोपर ते ठाणे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी विक्रोळी ते ठाणेदरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावरील 706 झाडे बाधित होणार आहेत. त्यातील 320 झाडे कापली जाणार असून 386 झाडे दुसरीकडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. झाडांची कत्तल आणि पुनर्रोपणाला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. याच अनुषंगाने अॅड. सागर देवरे यांनी यापूर्वी एमएमआरडीए आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

























































