
>> मंगेश मोरे
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी जीआरपीच्या कारवाईविरुद्ध केलेल्या आंदोलनाचा विषय ताजा असतानाच आता पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष धगधगत आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात मोटरमनचे कॅण्टीन सुरू करण्याला प्रशासनाने लगाम लावला आहे. कमी वेळेत लॉबीशेजारी नाश्ता करण्यास तसेच घरचा डबा खाण्यास जागाच नसल्यामुळे अनेक मोटरमनना उपाशीपोटी लोकल चालवावी लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर मोटरमनच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर जवळपास 1100 मोटरमन आहेत. या मार्गावर चर्चगेट स्थानकातून बोरिवली, विरार आणि डहाणूपर्यंत लोकल ट्रेन चालवल्या जातात. या ठिकाणी मोटरमन आणि गार्डची मुख्य लॉबी असून दिवसरात्र येथे त्यांची ये-जा सुरू असते. मोटरमनच्या सोयीसाठी अनेक वर्षांपासून स्टेशन मास्तर कार्यालयासमोर पॅण्टीन सुरू होते. मात्र कॅण्टीनच्या खाली असलेल्या केक शॉपला 5 जून रोजी आग लागली आणि ते कॅण्टीन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. नंतर कॅण्टीन कम विश्रांतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले, परंतु तेथे चहा-नाश्ता बनवण्यास मनाई करीत प्रशासनाने मोटरमनच्या कॅण्टीनला अनिश्चित काळासाठी लगाम लावला आहे. कर्मचारी संघटनांनी चार महिने वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही प्रशासनाने कॅण्टीन सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठय़ा धोरणाविरोधात मोटरमनमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लॉबीमध्येच हातात डबा घेऊन उदरभरण
मोटरमनला चर्चगेट स्थानकात जेवणासाठी योग्य जागा नसल्यामुळे ते लॉबीमधील बाकावरच हातात डबे घेऊन उदरभरण करीत आहेत. प्रशासन आगीच्या धोक्याचे कारण देत आहे. मग खासगी स्टॉल्सना कशी परवानगी दिली जातेय, असा सवाल काहींनी उपस्थित केला.
विविध संघटना ऑक्टिव्ह मोडवर
कॅण्टीनअभावी मोटरमनची गैरसोय होत असल्याच्या मुद्दय़ावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. यासंदर्भात लवकरच डीआरएमची भेट घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस अरुण दुबे यांनी दिली.


























































