जाऊ शब्दांच्या गावा – गोष्ट नळाची

>> साधना गोरे

शहरातच काय आता गावाकडेही घराघरांत पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठी विहीर, नदी यांचे पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरीसारखा पाण्याचा मूळ स्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे, पण आज आपण ज्या अर्थाने नळ शब्द वापरतो, त्या अर्थाचे मूळ काहीसे गोंधळात टाकणारे आहे.

संस्पृतमध्ये ‘प्रणालः’ असा एक शब्द आहे. ‘प्रणालः’पासून प्रणाली, प्रणालिका असेही शब्द तयार झाले आहेत. आज आपण मराठीत पद्धत, रीत, क्रम, परंपरा या अर्थाने प्रणाली शब्द वापरतो. उदा. कार्यप्रणाली. या ‘प्रणालः’ शब्दाचा मूळ अर्थ आहे – जलाशयातील पाणी काढण्याचा मार्ग किंवा रस्ता. हा मार्ग मोठय़ा कालव्याच्या रूपात असू शकतो किंवा लहान नाला किंवा नालीसुद्धा असू शकतो. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीवर व्यवस्थित पडावे म्हणून पन्हाळी लावतात. हा ‘पन्हाळ’ शब्दही या ‘प्रणालः’ शब्दापासूनच तयार झाला आहे.

मराठीत कमळाच्या देठाला ‘नळ’ किंवा ‘नाळ’ म्हणतात. कमळाचे देठ आतून नळासारखेच पोकळ असतात. त्यावरूनच संस्पृतमध्ये कमळाला ‘नलिनः’ म्हटले गेले असावे तसेच कमळाचा देठ, कमळाचे तळ किंवा कमलसमूह यांना ‘नलिनी’ म्हटले जाते. कमळाच्या देठाप्रमाणे कांद्याची पातसुद्धा आतून पोकळ असते. या कांदा वनस्पतीच्या मधोमध एक मोठी पात येते, त्याला नळा म्हणतात. हा नळा आला की, कांदा वनस्पतीची वाढ खुंटते. असे नळे आले की, शेतकरी शेतातून कांदे काढण्याची वेळ झाली असे समजतो.

आपण आता घरात वापरतो तो नळ प्रणालः व नलिनी यांतल्या कोणत्या शब्दापासून आला याविषयी शब्दकोशांतून निश्चित काही कळत नाही. मात्र नळाशी संबंधित विविध रूपे वापरात दिसतात. मोरीचे पाणी वाहून नेण्यासाठी दगड, माती किंवा लोखंड, तांबे इ. धातूंचा फुंकणीच्या आकाराला नळ किंवा नाली म्हणतात. गटाराला तर सर्रास नाली किंवा नाला म्हणतात. आपल्या काही अवयवांच्या नावांतही नळसदृश्य शब्द आहेत. उदा. मोठय़ा आतडय़ाच्या वरच्या भागाला नळ म्हणतात. विविध कारणांनी वायू निर्माण होऊन ते फुगतात. बाळ गर्भात असताना ते नाळेमार्फत आईशी जोडलेले असते. या नाळेतूनच बाळाला अन्न पुरवले जाते. गुडघ्यापासून घोटय़ापर्यंतच्या हाडाला नळकाठी, नळगुडी, नडगी अशी नावे आहेत. त्यावरून धोतर, लुगडे गुडघ्याच्या वर नेसण्याला ‘नळीवर नेसणे’ म्हणतात.

जुन्या काळी वाटोळ्या आकाराचे कुलूप असे. त्याची किल्ली लांब सळईप्रमाणे असे. म्हणून त्याला नळीचे कुलूप म्हटले जाई. अर्धगोलाकार काwलांना नळीची कौले म्हणतात. तेल वगैरे ओतण्याच्या मापाला नाळके किंवा नळकांडे म्हणतात. दोन टेकडय़ांतील अरुंद वाट किंवा पावसाच्या पाण्याने डोंगरामध्ये पडलेली घळ, भुयारांतील रस्ता यांना नाळ म्हणतात.

मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टीलाही तशीच स्थिती प्राप्त होणे या अर्थाने ‘गाडीसंगे नळ्याची यात्रा’ हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल. पूर्वी बैलगाडय़ा दूरच्या प्रवासासाठी निघत तेव्हा चाकांना लावण्याचे तेल सोबतच ठेवावे लागे. हे तेल वेळूच्या म्हणजे बांबूच्या पात्रात ठेवले जाई. वेळू आतून पोकळ असतो. त्या पोकळीचा भांडय़ासारखा उपयोग केला जाई. वेळूच्या या पात्राला नळा म्हटले जात असे. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही हे सांगण्यासाठी ‘कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडं ते वाकडंच’ ही म्हण वापरली जाते. मांसाहाराचं महत्त्व सांगणारी म्हण म्हणजे ‘एक नळी अन् शंभर पोळी.’

घोडय़ाच्या टाचेला नाल ठोकली जाते. म्हणजे अर्धचंद्राकार लोखंडाचा तुकडा ठोकला जातो. त्यामुळे घोडय़ाच्या टाचा फार झिजत नाहीत.  हा ‘नाल’ शब्द मात्र नळच्या साखळीतील नाही, तो मूळ अरबी आहे.

नळी, पन्हाळ, नाळ, नाल, नाला, नाली, नाळकं, नळकांडं असा हा नळ शब्दाचा गोतावळा. आणखी एक गंमत म्हणजे, महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात नळाला चावी म्हटले जाते. चावी म्हणजे खरे तर किल्ली, ज्याने कुलूप उघडते अन् बंद होते. कुलूप उघड-बंद करताना किल्लीची जी क्रिया होते, काहीशी तशीच कृती नळ चालू-बंद करताना करावी लागते. म्हणूनच नळाला चावी म्हटले गेले असावे. किल्लीचे चावी हे नाव पोर्तुगीज ‘चावे’ शब्दावरून पडले आहे.