
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. दोन जागांवर विजयी उमेदवारांना मिळालेल्या समान मतांच्या संख्येवर आरजेडीने प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारमधील राजगीर आणि कुधनी या दोन विधानसभा मतदारसंघावरून आरजेडीने हा प्रश्न उपस्थित केला आहे. यापैकी एका जागेवर जेडीयूने विजय मिळवला, तर दुसऱ्या जागेवर भाजप उमेदवाराने विजय मिळवला आहे.
आरजेडीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही जागांसाठीच्या निवडणूक निकालांचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. राजगीर मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार कौशल किशोर यांना एकूण १,०७,८११ मते मिळाली आणि ते ५५,४२८ मतांनी विजयी झाले. सीपीआयएमएलचे उमेदवार विश्वनाथ चौधरी ५२,३८३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
तसेच कुढनी मतदारसंघात भाजपने केदार पीडी गुप्ता यांना उमेदवारी दिली. केदार यांनी ९,७१८ मतांनी विजय मिळवला, एकूण १,०७,८११ मते मिळवली. आरजेडीचे सुनील कुमार सुमन ९८,०९३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आरजेडी उमेदवार ९,७१८ मतांनी पराभूत झाले.
या दोन्ही जागांवर आणि उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांवर आरजेडीने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून आरजेडीने उपहासात्मक टीका करत म्हटलं आहे की, “या दोन्ही विद्यार्थ्यांनी मास्टर ज्ञानेश कुमार गुप्ता यांना कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्या होत्या. कोणताही प्रयत्न किंवा भेदभाव न करता, मास्टरने त्यांना समान गुण दिले.”
इन दोनों छात्रों ने मास्टर ज्ञानेश कुमार गुप्ता को खाली कॉपी जमा किया था। मास्टर साहब ने माथापच्ची और भेदभाव किए बिना दोनों को एक जैसे ही अंक दे दिए। #Bihar pic.twitter.com/EpcJG5eCMb
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 21, 2025





























































