जम्मू-कश्मीरातील रुग्णालये होती ‘डॉक्टर टेरर मॉड्यूल’च्या निशाण्यावर, हमासप्रमाणे साधायचा होता डाव; दिल्ली बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनचे नाव आले समोर

दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या डॉक्टर टेरर मॉडय़ूलने ‘हमास’प्रमाणे जम्मू-कश्मीरमधील रुग्णालयांना लक्ष्य करण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. याशिवाय दिल्ली बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सहभाग आल्याचे समोर आले आहे. इंडियन मुजाहिदीनचा फरार दहशतवादी अल-फलाह विद्यापीठाचा माजी विद्यार्थी निघाला. त्यामुळे या हल्ल्यात आणखी दहशतवादी संघटनांचाही सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा शादाब बेग या इंडियन मुजाहिदीनच्या फरार दहशतवाद्याचे नाव समोर आले आहे. तो 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर देशाबाहेर पळून गेला होता. त्याने अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयातून 2007मध्ये बी. टेक. ही पदवी घेतली. त्याच वर्षी त्याने गोरखपूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगड येथील रहिवाशी असून राजस्थान आणि गुजरातमध्ये 2008मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी तो तपास यंत्रणांना हवा आहे.

दरम्यान, डॉ. मुझम्मील शकील गनी, डॉ. आदिल रादर, डॉ. शाहीना सईद आणि मौलवी इरफान मोहम्मद यांना एनआयएने अटक करून ताब्यात घेतले. या सर्वांना 10 दिवसांची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हमासची योजना केली कॉपी

हमासने यापूर्वी काही रुग्णालयांवर हल्ले केले होते. तसेच जगाच्या नजरेतून वाचण्यासाठी रुग्णालयांमध्ये शस्त्रs लपवून ठेवत असल्याचे उघडकीस आले होते. ‘जैश’च्या मॉडय़ूलने हीच योजना कॉपी केली आहे. त्यांनी जम्मू-कश्मीरमधील किती आणि कोणत्या रुग्णालयांना लक्ष्य केले होते, याची माहिती शोधून काढण्यात येत असल्याचे तपास यंत्रणाच्या सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानातून पाठवले बॉम्ब बनविण्याचे व्हिडिओ

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून मदत मिळत होती, याचा पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. डॉ. शकील याला हंजुल्ला नावाच्या पाकिस्तानातील हॅंडलरने बॉम्ब बनविण्याचे 40 व्हिडिओ पाठविले होते. जम्मूतील शोपिया येथील मौलवी इरफान अहमद याने दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर अनेक डॉक्टरांना मॉडय़ूलमध्ये जोडण्यात आले. हंजुल्ला हे एखादे कोड नेम असू शकते, अशी शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली आहे.