डॉ गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरण, अनंत गर्जे याला अटक; तीन दिवसांची कोठडी

डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी रविवारी पहाटे गौरी यांचा पती व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याचा स्वीस सहाय्यक अनंत गर्जे याला अटक केली. अनंतला आज शिवडी न्यायालयात हजर केले असता 27 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

डॉ. गौरी यांनी त्यांच्या वरळी येथील घरी शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार समोर येताच डॉ. गौरी यांच्या मृत्यूला त्यांचा पती अनंत गर्जे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या पालकांनी वरळी पोलिसांत तक्रार दिली होती. अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनंत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु अनंत हा बेपत्ता होता. अखेर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अनंत वरळी पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी अनंतला अटक करून आज दुपारी शिवडी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर अनंतची तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी मंजूर केली.

गुन्ह्याचा तपास करायचा आहे

अनंतला अटक झाली असली तरी अजून गौरी यांचा शवविच्छेदन अहवाल यायचा आहे. गौरी यांना जे काही गर्भपाताचे कागदपत्र मिळाले होते, त्या अनुषंगाने तपास करायचा आहे. शिवाय या गुन्ह्यातील दोन आरोपींचीदेखील चौकशी होणे बाकी असल्याने अनंतची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र न्यायालयाने अनंत याचे वकील मंगेश देशमुख यांची बाजू ऐकल्यानंतर अनंतला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.