खोपोलीत शिवसेना उमेदवारांची प्रचारात आघाडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

खोपोली नगरपालिकेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या 31 जागांसाठी 118 उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 8 उमेदवार रिंगणात उतरवले असून सर्वच उमेदवार प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

प्रभाग 13 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात जयश्री चाळके आणि माजी नगरसेवक नितीन पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना प्रवक्ते विलास चाळके यांचा प्रभागात चांगला लोकसंपर्क आहे. शिवाय जयश्री चाळके यांचे वडील वसंत मोरे यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. याचा फायदा जयश्री चाळके आणि नितीन पवार या दोन्ही उमेदवारांना होणार आहे.

शिंदे गटावर मतदार नाराज

खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सभागृह मागील आठ वर्षांपासून बंद असून त्याचा अद्याप पडदा उघडला नाही. भुयारी गटार योजना अपूर्ण आहे. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त आहे. खोपोली शहर व उपनगरातील रस्ते खड्डेमय असून खोपोलीचा विकास फक्त शिंदे गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या घरातच झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदार शिंदै गटावर नाराज आहेत.

ठाणे पालिकेत मनसेचे आंदोलन; सदोष मतदार याद्या फाडल्या

एका प्रभागाचे मतदार दुसऱ्या प्रभागात, मतदार यादीत मतदारांचे फोटो नाहीत, अनेक मतदारांची ओळखच पटेना यांसारख्या अशा अनेक तक्रारी घेऊन मनसेने आज ठाणे महापालिका मुख्यालयावर धडक दिली. पालिकेच्या निवडणूक विभागात ठिय्या देत मनसेने जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांसमोर सदोष मतदार याद्या फाडल्या. ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार असून प्रत्येक प्रभागात सर्वसाधारणपणे वीस, पंचवीस हजार किंवा 25 टक्के मतदार संख्या वाढली आहे. मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदार संख्या, मतदार यादीमधील संख्या यामध्येही काही हजारांची तफावत आहे. ही गंभीर बाब मतदार याद्यामध्ये दिसून आली आहे. याविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या इशाऱ्यावर

काँग्रेसचा आरोप भाईंदर – निवडणूक आयोग हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतदेखील बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोपही त्यांनी केला. सदोष मतदार याद्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. निवडणूक विभागाने याद्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.