20 हजारांची लाच घेताना स्वच्छता निरीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळय़ात

भविष्यात दुकानावर कारवाई न करण्याकरिता 30 हजारांचा वार्षिक हप्ता मागून तडजोडीअंती 20 हजारांची लाच घेताना पालिकेचा स्वच्छता निरीक्षक ट्रप झाला. दिलीप सरवदे (57) असे त्याचे नाव असून अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात तो रंगेहाथ सापडला. शंकर (नाव बदललेले) यांचे दहिसर पुरवलेल्या भोजनालय आहे. त्यावर आर/उत्तर वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक दिलीप सरवदे याने परवाना नसल्याने कारवाई केली होती. त्यावेळी शंकर यांच्या भोजनालयातील सामान जप्त करण्यात आले होते. ते सामान सोडविण्यासाठी शंकर यांनी सरवदे यांची भेट घेतली असता यापुढे कारवाई न करण्याकरिता 30 हजार वार्षिक हप्ता द्यावा लागेल अशी मागणी सरवदे यांनी केली. मात्र लाच द्यायची नसल्याने शंकर यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात सरवदे यांना तडजोडीअंती ठरलेली 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.