
माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सध्या गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. अनियमित व्याख्याने, वर्गखोल्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद लिफ्ट-पंखे, पाणी पुरवठय़ाचा अभाव आदी समस्यांमुळे विद्यार्थी हैराण आहेत. याबाबत शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत आज युवासेनेने महाविद्यालयावर धडक देत विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी केली.
कॉलेजमध्ये सीएस, आयटी या अभ्यासक्रमाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल नियमित होत नाहीत किंवा प्राध्यापक नसल्यामुळे रद्द होतात. स्वच्छतागृहाची देखभाल होत नाही. नवीन इमारतीमध्ये प्रॅक्टिकल रूम चौथ्या मजल्यावर आहे. तेथे जाण्याकरिता लिफ्ट नाही. कॅण्टीन सुविधा बंद असल्यामुळे पूर्णवेळ महाविद्यालयात असणाऱया विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याची दखल घेत शिवसेना संपर्पप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, जयेश देसाई आदींनी रूपारेल महाविद्यालय ट्रस्टी डॉ. अनिता अहमद आणि प्राचार्य डॉ. दिलीप म्हस्के यांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले. प्रत्येक मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यात आला.
अशा आहेत इतर समस्या
खेळाडू विद्यार्थ्यांना मॅच किट सुविधा मागील वर्षापासून देण्यात आलेली नाही. युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना कोणतेही उपस्थिती लाभ देण्यात येत नाही. बी.एम.एस विभागात वॉटर फिल्टर मागील तीन वर्षांपासून बंद आहे. कामगार व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. कॉलेज प्लेसमेंट सक्रिय नसल्यामुळे हुकणाऱ्या नोकरीच्या संधी.


























































