
बिबटे जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुरेसे खायला मिळत नसल्याने भुकेने कासावीस होऊन बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडत आहेत. वन्य प्राण्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे हे सरकारचे काम असते. त्यामुळे बिबटय़ांच्या उपासमारीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप बिबटय़ांच्या संरक्षणासाठी कार्यरत ‘वाघवर्धिनी’ सेवाभावी संस्थेने केला आहे.
बिबटय़ांना जंगलातच पुरेशी शिकार मिळाली तर ते जंगलाबाहेर पाय ठेवणार नाहीत. परंतु विकासाच्या नावाखाली चाललेल्या जंगलतोडीमुळे जंगले बोडकी होऊ लागली आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत बिबटय़ासारख्या प्राण्याला शिकार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच बिबटे मानवी वस्त्यांमध्ये घुसत असल्याचे ‘वाघवर्धिनी’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. नामदेव गुंजाळ यांनी सांगितले.


























































