निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा विजय! कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका न्यायालयाने केली मान्य

court

कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगराध्यक्षपद व नगरसेवक पदांसाठी दाखल उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल अपीलावर सुनावणी झाली. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. डी. डी. आलमाले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांची भूमिका ग्राह्य धरत अपील फेटाळले.

या प्रकरणातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सचोटी, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची कसोटी लागली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोणतीही प्रक्रिया-त्रुटी नसल्याचे आणि पूर्वग्रहदूषित भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.

कोपरगाव नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे (गायसमुद्रे), सहाय्यक अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप यांची टीम काम पाहत आहे. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी (दि.17) शेवटच्या दोन तासांत 125 अर्ज दाखल झाले होते. त्यांची प्राथमिक तपासणी दुसऱया दिवशी पहाटेपर्यंत सुरू होती. छाननी व हरकती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 237 अर्जांपैकी 56 अर्ज हरकत आणि पात्रता तपासणीमुळे अवैध ठरले. नंतर एका राजकीय पक्षाने प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरीबाबत आक्षेप घेत कोर्टात अपील दाखल केले.

यावर 22 व 23 रोजी दोन्ही बाजूंनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी छाननीच्या वेळी अपीलकर्त्यांनी कोणतीही लेखी अथवा तोंडी हरकत नोंदविली नव्हती, असे स्पष्ट सांगितले. न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देत अपील फेटाळले.