
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या चोरींमध्ये आता कोळगाव थडीतील घटनेची भर पडली आहे. सिव्हिल इंजिनिअर प्रमोद धामणे यांच्या बंद बंगल्यात शनिवारी (दि. 22 नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटय़ांनी लाखोंच्या ऐवजांवर डल्ला मारला. या घटनेने परिसरात खळबळ उडली असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धामणे परिवार लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची पाळत ठेवून चोरटय़ांनी चोरी केली. धामणे हे दुमजली बंगल्यात राहत असून, 27 तोळे सोने, 2.75 लाखांची रोकड आणि 250 ग्रॅम चांदी असा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष धामणे यांच्या बंगल्याशेजारील वाकचौरे यांच्या घरात रात्री 1 वाजेपर्यंत लग्नाची मेहंदी सुरू होती. यावरून पूर्ण माहिती असलेल्या संघटित टोळीने हे काम केल्याचा नागरिकांचा दावा आहे.
दरम्यान सुरेगाव, अंबिकानगर, कोळपेवाडी परिसरात सुरू असलेल्या सततच्या चोरींचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.




























































