
सोनखेड पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चक्क ठाण्यातच तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेण्याचा प्रताप केल्याने त्याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. पकडण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव गणपत गिते असे आहे. कारवाईने जिल्हा पोलिस दलाची मान शरमेने खाली झाली आहे.
तक्रारदाराने सोनखेड पोलीस ठाण्यात दि.24 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली की, तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे जवळा (ता. लोहा जि. नांदेड) येथे 20 गुंठे शेतजमीन आहे. दि.13 नोव्हेंबर रोजी त्या शेतात घुसून शेजाऱ्यांनी शेतात लावलेली तुर उपटून टाकली आणि त्याठिकाणी ज्वारी पेरणी करू लागले. त्यावेळी तक्रारदाराचा भाऊ व वडील शेतात गेले असता त्यांच्यामध्ये वाद होऊन मारामारी झाली. त्याबाबत दि.17 नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या फिर्यादीवरुन त्यांच्या शेजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक गणपत गिते हे करीत आहेत. तसेच विरोधी पार्टीच्या तक्रारीवरुन तक्रारदार, त्यांचे वडिल व भावावर सोनखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली आहे. तक्रारदारांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी व विरोधकांवर कारवाई करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी गिते यांनी केली. त्यावेळी नाईलाजास्तव तडजोडी अंती तक्रारदारांनी त्यांना 10 हजार रुपये दिले होते. दि.20 नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत गिते यांनी तक्रारदारांना सोनखेड पोलीस ठाण्यात बोलावून तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून विरोधातील लोकांवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारदारावर दाखल एनसीमध्ये मदत करण्यासाठी आणखीन 10 हजार दे म्हणून पैशाची मागणी केली.
सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील लोकांवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारदारांना मदत करण्यासाठी शासकीय पंचासमक्ष दि.25 नोव्हेंबर रोजी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी गिते यांनी केली व तडजोडीअंती 5 हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दिल्याचे पडताळणीदरम्यान निष्पन्न झाले. नंतर या पथकाने सापळा रचला असता सोनखेड पोलिस ठाण्यात गिते याने शासकीय पंचासमक्ष तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच स्वीकारण्याचा आगावूपणा केला. या पथकाने आरोपी गितेची अंगझडती घेतली असता रोख 15 हजार रुपये, 1 तोळ्याची गळ्यातील सोन्याची साखळी, प्रत्येकी 5 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅमची चांदीची अंगठी, फास्टट्रॅक कंपनीची एक घड्याळ, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे. आरोपी लोकसेवकाच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी गितेला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्याची तजवीज करुन ठेवली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक करीम खान पठाण, पर्यवेक्षण अधिकारी उपाधीक्षक प्रशांत पवार, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलाच्या प्रतिमेला तडा गेला असून एकीकडे पोलिस अधिकारी व प्रशासन गुन्हेगारी कारवाया रोखत असल्याचा दावा करीत असताना पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकारी उघड उघड लाच घेत असल्याच्या घटनेने मान शरमेने खाली गेली आहे.






























































