
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधना हिचे आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. पण ऐन मुहूर्ताच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि लग्न पुढे ढकलण्यात आले. याचवेळी पलाशही रुग्णालयात दाखल झाल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांचे मोहोळ उठले. अशातच आता स्मृतीने एक मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
स्मृती मानधना ही ‘कौन बनेगा करोडपती-17’ च्या विशेष वर्ल्डकप एपिसोडमध्ये सहभागी होणार होती. मात्र वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे तिने या विशेष भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे ढकललेले लग्न, वडिलांची बिघडलेली तब्येत यामुळे स्मृतीच्या मनावर ताण आला असून कुटुंबाची प्रायव्हसी जपण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
त्या दिवशी काय घडलं?
स्मृती-पलाश यांचा विवाह रविवारी त्यांच्या मूळ गावी सांगलीत होणार होता. हळद, मेहेंदी, संगीतचा कार्यक्रम जोरात झाला होता. टीम इंडियाच्या विश्वविजेत्या खेळाडूही या सोहळ्याला उपस्थित होत्या. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे स्मृती-पालशचे लग्न पुढे ढकलण्यात आले.
मंगळवारी डिस्चार्ज
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना मंगळवारी सांगली येथील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निःश्वास टाकला आहे.

























































