राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर कोसळला बास्केटबॉलचा खांब, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

हरयाणात दोन दु:खद घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळणाऱ्या खेळाडूचा अंगावर खांब पडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहतकमधील लखन माजरा गावात घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत बास्केटबॉलचा खांब पडून त्यातीह खेळाडूचा मृत्यू झाला आहे. दोन्ही विद्यार्थी दहावीचे आहेत. दोघांनाही बास्केटबॉलमध्ये करिअर करायचे होते. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हार्दिक राठी असे त्याचे नाव असून सराव करत असताना हा अपघात घडला. त्याने उंच उडी घेऊन बास्केटबॉलच्या खांब्याला पकडले आणि तो खांब त्याच्यावरच कोसळला. हार्दिक खांबा खाली दबला आणि पोलची एक बाजू हार्दिकच्या छातीवर जोरदार लागली. त्याच्या मित्राने पाहिल्यावर तो धावत त्याच्या दिशेने आला. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये तो कोर्टवर एकटाच सराव करत असल्याचे दिसून येते. तो थ्री पॉईंट रेषेवरून पळत येतो  आणि अर्धवर्तुळाजवळील खांबाकडे उडी मारून तो खांब पकडतो.  बास्केट पकडताच खांब मुळापासून उखडतो आणि त्याच्यावर पडतो.

तर दुसऱ्या घटनेत बहादूरगडच्या अमनसोबत असाच प्रकार झाला. त्यालाही जीव गमवावा लागला. अमनच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अमनवर योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.