
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. शिंदेंनी डहाणूत केलेल्या टीकेवर फडणवीसांनी आज तिथूनच पलटवार केला. तुमची लंका आमचा भरत जाळणार. जे विकासविरोधी आहेत त्यांची लंका पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत फडणवीसांनी शिंदेंचे ‘लंका दहन’ केले.
डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना असून आज डहाणूतील सभेत फडणवीसांनी शिंदे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. ‘तुमची लंका जाळून टाकतो वगैरे कुणी म्हणालं असेल तर म्हणू दे. त्याकडे दुर्लक्ष करा. आपण लंकेत राहतच नाही. आपण प्रभू श्रीरामाचे अनुयायी आहोत. रावणाचे नाही’, असे सांगत फडणवीस यांनी शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला. आमचा उमेदवार भरत आहे. भरत हा रामाचा छोटा भाऊ. रामाच्या भावाची लंका असू शकते का?, असा प्रश्न विचारत अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, असे फडणवीस म्हणाले. आम्हाला विकास समजतो. आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्यासाठी नको आहे, असा टोलाही त्यांनी शिंदेंना हाणला.
शिंदे काय म्हणाले होते?
एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात आपण एकत्र आलो आहोत. अहंकाराने रावणाची लंका जळून खाक झाली होती आणि येणाऱया 2 तारखेला आपल्याला तेच करायचे आहे, असे शिंदे डहाणूच्या सभेत म्हणाले होते.































































