राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसा जागा हो!

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आधी मुंबई आणि नंतर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सावधगिरीचा इशारा देतानाच मराठी माणसा जागा हो, असे कळकळीचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करत मराठी माणसाला साद घातली आहे. मुंबई मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. त्यामुळे मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दल गेली अनेक दशके महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र सिंग हे जम्मूमधून येतात. त्यांचा मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातशीही काहीही संबंध नाही. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मराठी माणसे भाजपच्या डोळय़ात खुपताहेत

‘तमाम मराठीजनांना माझे आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकते. मुंबईत पिढय़ान्पिढय़ा राहणारी मराठी माणसे, मुंबा देवीची लेकरे आणि त्यांचे शहर भाजपवाल्यांना खुपतेय,’ असे ते म्हणाले.

मुंबई ताब्यात घेण्याचा डाव

आज केंद्र सरकारने चंदिगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100 टक्के शिजत असणार, ‘मुंबई’ नको ‘बॉम्बे’च हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे, असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरू केले आहे हे आपण रोज पाहतो आहोतच, आता मुंबई महानगर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आतातरी मराठी माणसांना कळायला हवे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

आयआयटीच्या गेटवर झळकले ‘आयआयटी मुंबई’चे बॅनर

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आणि बॉम्बेविरुद्ध मुंबई हा वाद वाढला. मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले.