
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुढील वर्षी होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत होणार नसल्याने संताप व्यक्त केला आहे. आयसीसी खेळामध्ये राजकारण करत असल्याची टीका करतानाच, अंतिम सामना अहमदाबादलाच का, मुंबईत वानखेडे स्टेडियमवर का नको असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक मोठय़ा स्पर्धेची फायनल अहमदाबादला आयोजित करण्याचे काय प्रयोजन आहे? अहमदाबाद पारंपरिक क्रिकेट केंद्र तरी आहे का? वर्ल्ड कपची फायनल मुंबईत का नाही? टी-20 वर्ल्डकपच्या फायनलसाठी मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे अगदी चपखल ठिकाण आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजकारण करू नका
‘2011 वर्ल्डकपची फायनल वानखेडे स्टेडियमवरच झाली होती. 2023 वन-डे वर्ल्डकपची फायनल अहमदाबादमध्ये झाली होती. आयसीसीने वर्ल्डकप फायनल ठरवताना राजकारण आणि सोयीच्यांना झुकतं माप देण्याचा प्रकार करू नये’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईवर अन्याय झालाय
‘ज्याप्रमाणे इडन गार्डन्स- कोलकाता, एम चिदंबरम स्टेडियम-चेन्नई, आयईएस बिंद्रा स्टेडियम- मोहाली, ही सगळी मैदानंही टी-20 वर्ल्डकप फायनलसाठी सुयोग्य ठिकाणं आहेत. मात्र मर्जीतल्यांना झुकतं माप देण्याचं राजकारण सुरू आहे. मुंबईवर अन्याय झाला आहे’. असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.































































