
मुंबई शहर आणि उपनगरांना सलग चौथ्या दिवशी गंभीर प्रदूषणाचा विळखा कायम राहिला. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईची हवा ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचली आणि शहर जणू ‘गॅस चेंबर’ बनले. शहरातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने बुधवारी 226 अंकांची उच्चांकी पातळी गाठली. पहाटेपासून सायंकाळपर्यंत शहराच्या आकाशात तीव्र प्रदूषणाचे साम्राज्य होते. यात मुंबईकरांची प्रचंड घुसमट झाली. अनेकांना श्वास घेण्यात अडचण आली. प्रदूषित हवेमुळे अनेकजण सर्दी-खोकल्याने त्रस्त झाले आहेत.
मागील आठवडाभरापासून मुंबई शहरातील प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईची हवा विषारी बनत चालल्याने नागरिक आणि प्रशासन चिंतेत सापडले आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 ते 250 अंकांपर्यंतच्या गंभीर श्रेणीत नोंद होत आहे. बुधवारी हवेची गुणवत्ता प्रचंड ढासळली आणि मुंबईने प्रदूषित दिल्लीला मागे टाकले. पहाटे धुक्याबरोबरच मोठय़ा प्रमाणावर धुलीचे कण हवेत पसरले होते. त्यामुळे दृश्यमानता प्रचंड कमी झाली होती. दुपारी तीच स्थिती अनेक भागांत राहिली. सायंकाळच्या सुमारात प्रदूषणाची तीव्रता वाढली. एकीकडे कमाल तापमानात झालेली वाढ आणि त्याचवेळी वाढलेले प्रदूषण अशा विचित्र वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला.
‘एक्यूआय डॉट इन’वरील नोंदीनुसार, बुधवारी सायंकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 226 अंकांच्या उच्चांकी पातळीवर होता. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईची हवा 1.2 पटीने खराब नोंद झाली. वांद्रे-पुर्ला संपुल, भोईवाडा, बोरिवली पूर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, शिवाजी नगर, वांद्रे पूर्व या भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर नोंद झाला. शहराच्या उर्वरित भागांतही गंभीर श्रेणीतच हवेची गुणवत्ता नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य
पालिका प्रशासनाने एकाचवेळी अनेक रस्त्यांवर खोदकाम केले जात असल्याने ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बांधकामांच्या ठिकाणी धूळ थोपवण्यासाठी पंत्राटदारांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न आणखी गंभीर बनल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.























































