
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचे 1700 कोटींचे काम अदानी समुहातील एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ”भाजपचे मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
विचार करा…
केंद्रशासित नाही तर अदानीशासित…संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यासाठी आपण लढलो; प्राणपणाला लावून मुंबई जिंकली, ती मुंबई…
अदानी समूहाच्या हातात जाऊ द्यायची का? pic.twitter.com/lI19LASuOD— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 27, 2025
”मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा! चंदीगडमध्ये निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न झाला. त्या अधिकाऱ्याला पकडूनही त्याला काही शिक्षा झाली नाही, पण फिक्सिंग पकडल्यामुळे भाजपला महापौर पद मिळालं नाही. यानंतर चंदीगड पंजाबपासून तोडून, संपूर्णपणे केंद्रशासित आणि पंजाबपासून दूर करण्याचा प्रयत्न आता सुरू होता! संसदेत तसं बिलही येणार होतं. पंजाबने या गोष्टीला कडाडून विरोध केल्यानंतर आता हेच सरकार म्हणते, आम्ही असं काही केलंच नाही! भाजपची हीच मानसिकता मुंबईसाठीही धोक्याची आहे. आता तर त्यांनी पर्यायी मार्ग शोधला आहे, मुंबई सरळ अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा. धारावी “पुनर्विकास”, मिठी नदी प्रकल्प, मोकळे भूखंड जसे काही विकास आणि पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई अदानी समूहाला ‘भेट’ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकेच नाही, प्रथमच मुंबईत कचरा उचलण्यासाठी ‘अदानी कर’ लादण्याची तयारी भाजप करत आहे. विचार करा… केंद्रशासित नाही तर अदानीशासित. मुंबई महाराष्ट्राची नव्हे तर यांच्या मालकीची करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यासाठी आपण लढलो; प्राणपणाला लावून मुंबई जिंकली, ती मुंबई… अदानी समूहाच्या हातात जाऊ द्यायची का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमधून मुंबईकरांना केला आहे.




























































