आधार बदलणार… यूपीआय सोपं होणार! 1 डिसेंबरपासून नवीन नियम

येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱया नियमांमध्ये नवीन आधारकार्ड, यूपीआय, सॅलरी, पेन्शन, टॅक्स नियम, एलपीजी सिलिंडरच्या नव्या किमतीपर्यंत बदल होणार आहे. यूपीआयमध्ये ऑटोपे आणि सिक्योरिटी फीचर बदलतील. एसबीआयमधील एमकॅश सेवा बंद केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस निवडण्याची तारीखसुद्धा संपणार आहे. या सर्व बदलांचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे.

  • आधारकार्डमध्ये बदल ः 1 डिसेंबरपासून आधारकार्डमध्ये मोठा बदल होणार आहे. आधारकार्डवर नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि आधार नंबरऐवजी आता केवळ फोटो व एक क्यूआर कोड दिसणार आहे.
  • नवीन लेबर कोड ः देशात नवीन लेबर कोड लागू केले जाणार असून कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सीटीसी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल केला आहे. बेसिक सॅलरीचे एकूण वेतन कमीत कमी 50 ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • यूपीआय नियम बदलणार ः डिसेंबरपासून यूपीआयच्या नियमात बदल होईल. नवीन नियम 31 डिसेंबरपासून लागू होतील. ज्यात युजर्स आपल्या ऑटोपेला सब्सक्रिप्शन आणि ईएमआयला एकाच यूपीआय अॅपने मॅनेज करू शकतील. यूपीआय ट्रान्झॅक्शनसाठी फेस आणि बायोमेट्रिक ऑथेंटिक्स यासारखे नवीन सिक्योरिटी फीचर दिसतील.
  • एसबीआय एमकॅश सर्विस बंद ः देशातील एसबीआय बँकेची डिजिटल बँकिंग सर्विस एमकॅश बंद केली जाणार आहे. एसबीआय डिसेंबरच्या अखेरपर्यंत आपली नवीन योनो 2.0 अॅप सुरू करणार आहे. एमकॅश सेवेअंतर्गत ग्राहक मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे पैसे पाठवू शकत होते.
  • यूपीएस निवडण्याचा पर्याय बंद ः सरकारी कर्मचाऱयांसाठी युनिफाइड पेन्शन स्किम (यूपीएस) चा पर्याय बंद केला जाणार आहे. सरकारने यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अखेरची डेडलाईन दिली आहे. जर कोणताही सरकारी कर्मचारी यूपीएसच्या अंतर्गत येत असेल तर त्याला 1 डिसेंबरपूर्वी येणे बंधनकारक आहे.
  • पेन्शनधारकांसाठी 30 नोव्हेंबर डेडलाईन ः पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची डेडलाईन 30 नोव्हेंबर 2025 आहे. 1 डिसेंबर 2025 नंतर हे प्रमाणपत्र जमा करता येणार नाही. जर हे प्रमाणपत्र जमा केले नाही, तर पेन्शन थांबवली जाऊ शकते. घरी बसून डिजिटल पद्धतीनेही करता येऊ शकते.
  • एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल ः देशात पेट्रोलियम पदार्थांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा फेरविचार केला जातो. त्यामुळे दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल पाहायला मिळतो. यात व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही सिलिंडरच्या किमतीचा समावेश आहे.