तळ ठोकून बसा नाही तर विकासाचे गाजर दाखवा विजय शिवसेनेचाच होणार, अमोल किर्तीकर यांनी भाजपला सुनावले

पक्ष फोडाफोडी झाली. लोकप्रतिधींना पळवून झाले. खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्यात आले. मात्र तरी सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढताना सत्ताधाऱ्यांना अजूनही लोकांना विकासाचे गाजर दाखवावे लागते आणि याने सुद्धा शिवसैनिक आपल्याकडे वळत नाही म्हणून गल्ली बोळात देखील कित्येक दिवस सत्ताधाऱ्यांना तळ ठोकून बसावे लागते. याचाच अर्थ शिवसेनेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक अजुनही जागेवरच आहे. मुळ शिवसेनेतच आहे हेच शिवसैनिक सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा मनसुभा उधळून टाकतील याचीच मनात भिती असलेल्यांना तळ ठोकून बसावे लागते हाच शिवसेनेचा खरा विजय असल्याचे शिवसेना उपनेते आणि युवा सेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर हे नगरपंचायती आणि नगर परिषद निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवार आणि शिवसैनिकांना भेटण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोकणातील खेड , चिपळूण देवरुख कडे जाताना आपल्या मुळ गावी दापोलीत येवून नजिकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचा आढावा घेतला. त्यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर , दापोली शहर प्रमुख संदिप चव्हाण , शहर समन्वयक प्रदीप गमरे , प्रसाद कळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले शिवसेना संघटन मजबुतच आहे. ज्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव होता. ज्यांना सत्ताधाऱ्यांनी बेछूट आरोप करून बदनाम केले होते त्यातील काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले मात्र तरी सुद्धा निष्ठावंत मातोश्री मानणारा शिवसैनिक हा अजूनही जागेवरच आहे. तो मुळ शिवसेनेतच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी नेतृत्व आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वकृत्व आणि महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी असलेल्या कर्तृत्वाची खरी जाणीव प्रत्येक शिवसैनिकाला आहे. आज सत्ता नसली तरी सुद्धा शिवसेना हाच विचार शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग पेटवतो. सत्ता हे विकासाचे माध्यम जरुर आहे मात्र सत्ता हे सर्वस्व नाही. सत्तेसाठी जे गेले त्यांच्यामुळे शिवसेनेला फरक नाही. कारण सत्ता कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले ईतर ठिकाणचे सोडा पण दापोलीतील रस्ते पहा या रस्त्याने ते जाणार नाहीत का ? काय रस्त्यांची अवस्था आहे.अनेक गावांमधील नळपाणी पुरवठा योजना पहा काय ? परिस्थिती आहे. सत्ता आहे ना ? मग सत्तेचा उपयोग करून दया ना ? लोकांना पण नाही. शिवसेनेला राजकारणापेक्षा समाजकारणात अधिक रस आहे. सत्ता हे जरी समाजकारणाच्या विकासाचे माध्यम असले तरी सत्तेचा उपयोग हा आपल्याला होतोय का ? होत नाही. आरोग्य विभागाची काय परिस्थिती आहे वैद्यकीय अधिका-यांची पदे भरली गेलीत काय ? शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाची दैयनीय अवस्था आहे.दापोली विधानसभा मतदार संघाचा विचार करता येथील पशुवैद्यकीय दवाखाने पशुवैद्यकीय अधिका-यांच्या कमतरतेमुळे बंद पडलेत ही वस्तुस्थिती ते नाकारतील का ? कुणी अडवलय तुम्हाला भरती करु नये म्हणून फक्त उठसुट यांनी ठाकरे घराण्यावर टिका करायची बाकी आहे काय ? सत्तेत आहात ना ? विकासावर बोला यांनी विकास केला असता तर यांना सध्या निवडणूका आहेत त्या ठिकाणी तळच ठोकून बसावे लागले नसते. तळ ठोकून बसा नाहीतर टिका टिपणी करा खेड काय आणि अन्य ठिकाणी काय शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष तुमचे पाणीपत करेल अशाप्रकारचा जबरदस्त विश्वास शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला.