
एकीकडे अनेक मंत्र्यांना सरकारी बंगले मिळालेले नाहीत. अनेक मंत्री बंगल्याऐवजी फ्लॅटमध्ये राहतात. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट मंत्रालयासमोरील सरकारी बंगला बिनदिक्कतपणे वापरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. चव्हाण हे मंत्री नसतानाही मंत्र्यांसाठी राखीव बंगला वापरत आहेत आणि बंगल्यातील यंत्रणेवर मात्र सरकारी खर्च होत आहे.
रवींद्र चव्हाण हे मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांना मंत्रालयासमोरील ‘ए-6 रायगड’ हा बंगला देण्यात आला होता. विद्यमान सरकारमध्ये ते मंत्री नाहीत, सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र या सरकारी बंगल्याचा वापर बिनदिक्कतपणे करत आहेत. सरकारी बंगल्याचा पक्षकार्यासाठी बेकायदेशीरपणे वापर होत आहे. या सरकारी बंगल्यात भाजपच्या पदाधिकाऱयांच्या बैठका घेतल्या जातात. बंगल्यावरील सर्व व्यवस्था सरकारी खर्चाने चालवली जाते, वापर मात्र मंत्री नसलेली व्यक्ती करत आहेत, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
लोढांच्या सरकारी बंगल्यात होते बावनकुळेंचे वास्तव्य
रवींद्र चव्हाण हे एकच उदाहरण नाही तर काwशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला मंत्रालयासमोरील ‘बी-5’ बंगला तर भाजप प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनपुळे यांनीच बळकावला होता. बावनकुळेंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व कारभार याच सरकारी बंगल्यात सरकारी इतमामात होत होता. कारण लोढा यांना सरकारी बंगला मिळाला असतानाही ते मलबार हिल येथील स्वतःच्या बंगल्यातच वास्तव्याला होते. रवींद्र चव्हाण यांच्याकडूनही या ‘बी-5’ बंगल्याचा वापर अधूनमधून पक्षाच्या खासगी कामांसाठी केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.



























































