
‘अयोध्येचा राजा’, ‘माणूस’, ‘कुंकू’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘दो आँखे बारा हाथ’, ‘नवरंग’, ‘पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती ‘व्ही. शांताराम’ यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या सिनेमाचे लवकरच मोठ्या पडद्यावर पहिलं पोस्टर आऊट झाले असून सोशल मीडियावर अक्षरशा धुमाकूळ घालतोय.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.
‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे.

‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मिडियावर या पोस्टरने धुमाकूळ घातला आहे. यातील वैभव, भव्यता, दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची नवी लाट उसळली आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे. ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले असून भव्य दृश्यरचना आणि कलात्मक दृष्टीने त्यांनी या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेले आहे. राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स ॲण्ड रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत. येत्या नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


























































